छत्रपती शिवाजीराजे भोसले एक राजे एक उत्तम शासनकर्ता



छत्रपती शिवाजीराजे भोसले

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्‍नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्याप्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करुन त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

पहा प्रतापगडची लढाई
सिद्दी जौहरचे आक्रमण

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.
घोडखिंडीतली लढाई

पहा पावनखिंडीतील लढाई

पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वत: लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.
मुघल साम्राज्याशी संघर्ष

मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगझेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.
शाहिस्तेखान प्रकरण

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
सुरतेची पहिली लूट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वत: आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
आग्र्याहून सुटका
शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात दैवत मानतात

इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
सर्वत्र विजयी घोडदौड

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.
राज्याभिषेक
शिवाजी महाराजांची राजमुद्रा

६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.


त्याचा एक मावळा
उत्कर्ष शिंदे
(9890117570)
मदत - विकीपाडिया

No comments:

Post a Comment